। पोलादपूर । प्रतिनिधी ।
जेएनपीएच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत सामाजिक संस्था सस्टेनेबल अॅक्शन टुवर्ड ह्युमन एम्पॉवरमेंट (साथी) यांच्या मार्फत जेएनपीए सक्षम प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पता महिला शेतकर्यांना त्यांची अंगीभूत कौशल्ये आणि क्षमता सुधारण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. म्हसळा तालुक्यातील काळसूरी आणि साळविंडे येथे कृषी आधारित उत्पादनांची प्रक्रिया, क्लस्टर निर्मिती आणि विपणन व्यवस्था यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे.
यावेळी साथी सामाजिक संस्थेचे संचालक सौरभ कुमार यांनी महाराष्ट्रातील गरीब स्त्रिया फळे, कडधान्ये आणि तृणधान्ये यांसारखी कृषी आधारित उत्पादने गोळा करून आपला उदरनिर्वाह करतात. तंत्रज्ञानाचे अपुरे ज्ञान, शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध नसणे, मार्केटिंग यंत्रणा अपुरी, अकार्यक्षम असणे आणि यामध्ये शेतकर्याचे अधिकाधिक शोषक करण्याकडे कल असतो. या स्वरूपामुळे गरीब महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती देताना जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि साथी या सामाजिक संस्थेने हे काम सुरू केले आहे. याअंतर्गत 200 बहुजन म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व समाजातील महिला शेतकर्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असून याद्वारे गरीब महिलांच्या क्षमता वाढविण्यात येऊन त्या सक्षम होऊ शकतील. शाश्वत आणि स्वावलंबी पध्दतीने बाजार आणि जागतिक स्पर्धेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम परियोजना अत्यंत महत्वपूर्ण आहे, असेही सौरभ कुमार यांनी सांगितले.