वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

गोगावले-महाजनांच्या नियुक्तीवर शेकापचा आक्षेप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पालकमंत्री हे केवळ सत्तेतील प्रतिष्ठेचे पद नसून जिल्ह्याच्या विकासाचे, प्रशासनाच्या समन्वयाचे आणि जनतेच्या प्रश्नांचे नेतृत्व करणारी, मानसन्मान असलेली, उत्तम वक्तृत्व आणि संपूर्ण जिल्हा सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे व्यक्तीच्या सार्वजनिक भूमिकेपासून ते त्यांच्याभोवती निर्माण झालेल्या आरोपांपर्यंत प्रत्येक बाबीचा विचार करूनच अशा महत्त्वाच्या नियुक्त्या व्हायला हव्यात, अशी भूमिका शेकापने मांडली आहे. सार्वजनिक जीवनातील वक्तव्ये, सर्व घटकांचा सन्मान, प्रशासनाशी समन्वय आणि जनतेसमोरची उत्तरदायित्वाची भूमिका या पदासाठी महत्त्वाची असताना वादग्रस्त वक्तव्ये आणि आरोपांच्या चर्चेत असलेल्या आ. भरत गोगावले व गिरीश महाजन यांच्या गळ्यातच पालकमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याने शेकापने सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.

रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नियुक्तीवर शेकापने विशेषतः त्यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत आक्षेप घेतला आहे. महाडमधील एका कार्यक्रमात महिलांबाबत काम करणारा भाऊ पाहिजे की …बनवणारी बहीण पाहिजे अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप गोगावले यांच्यावर झाला होता. या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित झाला होता. ज्यांच्या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानावरून वाद निर्माण झाला, त्यांच्याच हातात संपूर्ण रायगडची धुरा देताना सरकारला महिलांच्या भावनांचा विचार करण्याची गरज वाटली नाही का? असा सवाल शेकापने उपस्थित केला आहे.

यापेक्षाही गोगावलेंच्या 15 ऑगस्टच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला अधिक धार आली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात त्यांनी काही दिवसांनी पालकमंत्रीपदाचा मान मिळेल, अशी शाश्वती आहे. आता अडचण, अडथळा राहिला नाही, असे म्हटले होते. अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच पद मिळणार असल्याची ‌‘शाश्वती‌‘ कुठून आली, असा सवाल आता उपस्थित होत आहे. अडथळा नेमका कोणाचा होता? कोणाच्या आक्षेपामुळे निर्णय रखडला होता? आणि तो अडथळा अचानक दूर कसा झाला? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणीही शेकापने केली आहे.

महाजनांच्या नियुक्तीवरही प्रश्न!
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या टेंडर प्रक्रियेबाबत तक्रारी आणि आरोप समोर आले आहेत. तक्रारदारांच्या दाव्यानुसार, 600 ते 700 कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप आहे. काही टेंडर अस्तित्वात नसतानाही पैसे घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे. या तक्रारींच्या संदर्भात तनय महाजन यांचे नाव समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांचा गिरीश महाजन यांच्याशी नातेसंबंध असल्याचा उल्लेख तक्रारींच्या मांडणीत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी शेकापने केली आहे.
सत्तेचे गणित की जनविश्वास?
रायगडमध्ये महिलांच्या सन्मानावरून वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा आणि नाशिकमध्ये कोट्यवधींच्या टेंडर प्रक्रियेवरील आरोपांची चर्चा ही दोन्ही प्रकरणे चर्चेत असतानाच दोन्ही नेत्यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे शेकापने सरकारला थेट सवाल केला. ‌‘पालकमंत्री निवडताना जनतेचा विश्वास पाहिला की सत्तेचे गणित? सार्वजनिक प्रतिमा पाहिली की राजकीय सोय? पालकमंत्रिपद हे जनतेची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने नियुक्तीचे निकष स्पष्ट करावेत आणि संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी शेकापने केली आहे.
Exit mobile version