पोलादपूरला स्कायवॉकची आवश्यकता

| पोलादपूर | प्रतिनिधी |

शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 अंडरपास गेल्यानंतर मंजूर नकाशामध्ये केवळ एका स्कायवॉकची तरतूद असताना आणखी चार व्हेईक्युलर ब्रिजचे बांधकाम करण्यात आले. दरम्यान, श्रीकाळभैरवनाथ देवस्थान व रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये जाण्यासाठी सहाव्या व्हेईक्युलर ब्रिजची मागणी जोर धरू लागली असताना केवळ स्कायवॉकला मंजूरी देत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत. मात्र, या स्कायवॉकच्या कामाची सुरूवात होण्यासाठी राजकीय स्टंटची अथवा विद्यार्थ्यांच्या बळीची गरज आहे काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान, पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान आणि रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये जाण्यासाठी सहाव्या व्हेईक्युलर ब्रिजची मागणी जोर धरू लागली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दर्पण दरेकर यांनी याप्रश्नी तीन दिवसांचे उपोषण केले तसेच राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले. याखेरिज, यानंतर पोलादपूर शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांचीही मागणी फेरी झाली.

महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाबाहेरील स्कायवॉकवर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बाहेरील तरूणाकडून चाकूहल्ला झाल्याची घटना आणि चोळईतील सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या स्कायवॉकवर अद्याप रहदारी नसल्याची वस्तुस्थिती पाहता श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीसमोर पश्चिमेकडील सर्व्हिसरोड व पूर्वेकडील सर्व्हिसरोड यामध्ये रहदारी होण्यासाठी संपूर्ण चारपदरी महामार्ग व दोन्हीकडील सर्व्हिसरोड यांच्यावरून पुर्वेकडील प्रभातनगर आणि पश्चिमेकडील प्रभातनगर या दोन लोकवस्त्यांना जोडणारा शाळेच्या लहान विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या महिलांनाही शक्य होईल, अशी सहाव्या व्हेईक्युलर ब्रिजची उभारणी करण्याची गरज आहे. तसे न झाल्यास थेट चारपदरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पूर्व आणि पश्चिमेच्या लोकांची सद्यस्थितीत सुरू असलेली वाटचाल कायम राहणार आहेत. सध्या पूर्व आणि पश्चिमेच्या विद्यार्थ्यांनीही स्टेट बॅक ऑफ इंडियासमोर तसेच समृध्दी अपार्टमेंटसमोर अंडरपास महामार्गाच्या संरक्षक लोखंडी कठडयांना ओलांडून जाण्यास सुरूवात केली असून भविष्यात याठिकाणी अपघात घडल्यास महामार्गाच्या सदोष नकाशामुळेच मनुष्यहानीची शक्यता निर्माण होणार आहे.

Exit mobile version