भारताला मोठा धक्का
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना न्यूझीलंड विरूद्धच्या एकमेव टी 20 सामन्याला मुकली होती. न्यूझीलंडमधील कडक विलगीकरणाच्या नियमामुळे भारतीय संघातील अनेक खेळाडू टी 20 सामन्यात खेळू शकले नाहीत. न्यूझीलंडमध्ये झालेला हा टी 20 सामना भारताने 18 धावांनी गमामवला. आता स्मृती मानधना टी 20 सामन्याबरोबरच पहिल्या वनडे सामन्यालाही मुकण्याची दाट शक्यता आहे.
स्मृती मानधना बरोबरच भारतीय संघातील मेघना सिंग आणि रेणुका सिंग या देखील विलगीकरणात आहेत. त्याही टी 20 सामन्यात खेळू शकल्या नव्हत्या. बुधवारी ( दि. 9) झालेल्या टी20 सामन्यात मानधनाच्या जागी यस्तिका भाटिया सलामीला उतरली होती. याबाबत बोलताना यस्तिकाने व्हर्च्युअल पोस्ट मॅच पत्रकार परिषदेत सांगितले की, मस्मृती, मेघना सिंग आणि रेणुका सिंग या न्यूझीलंड सरकारच्या कडक नियमानुसार अजूनही विलगीकरणात आहेत. सध्याच्या घडीला आम्ही इतकेच सांगू शकतो. दरम्यान, याबाबत बीसीसीआयकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. न्यूझीलंडच्या प्रवासाबाबतच्या कडक नियामांमुळे या तीन खेळाडूंना फटका बसला आहे. त्यामुळे त्या अजूनही विलगीकरणात आहेत.