रंगास्वामी यांच्या मते भारताला नेतृत्व बदल गरजेचा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सलामीवीर स्मृती मानधनाला अतिरिक्त जबाबदारीचे दडपण जाणवत नसून भारतीय महिला क्रिकेट संघाची पुढील कर्णधार म्हणून तीच सर्वात योग्य पर्याय असल्याचे मत भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी व्यक्त केले.
मिताली राजने निवृत्ती स्वीकारलेली नसली, तरी आता भारतीय संघाला नेतृत्वबदल गरजेचा असल्याचे रंगास्वामी यांना वाटते. मितालीने इच्छा असल्यास पुढेही खेळत राहावे. मात्र, आता भारताने भविष्याचा विचार करून नवी कर्णधार निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी स्मृती सर्वोत्तम पर्याय आहे. हरमनप्रीत कौरने खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. परंतु कर्णधाराने सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक असते. कर्णधारपदाच्या अतिरिक्त दडपणामुळे हरमनप्रीतचा खेळ खालावण्याची भीती आहे. मात्र, स्मृती हे दडपण अधिक योग्य पद्धतीने हाताळेल अशी माझी धारणा आहे. तिची मानसिकता कर्णधाराला साजेशी आहे,फफ असे रंगास्वामी म्हणाल्या.
मिताली आणि झुलन गोस्वामी यांनी दोन दशके भारतीय महिला क्रिकेटची उत्कृष्ट सेवा केली. मात्र, आता भारताने भविष्याचा विचार करून या दोघींना निरोप दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी यांनी व्यक्त केली. मिताली आणि झुलन यांच्या कारकीर्दीचा अंतिम टप्पा आला आहे. भारताने आता युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे, असे एडल्जी म्हणाल्या.