सोशल मिडीयाद्वारे दिली माहिती
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल हे दोघे गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काही कारणानाने त्यांचे लग्न पुढे ढकळण्यात आले होते. मात्र, आता त्यांचे लग्न रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. या बाबत दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
भारतीय माहिला क्रिकेटपटू स्मृतीने भारतीय संघासह 2 नोव्हेंबरला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. सांगलीमध्ये 23 नोव्हेंबर रोजी या दोघांचे लग्न होते. लग्नाआधीचे सर्व सोहळेही उत्साहात पार पडले होते. मात्र, लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर लग्न पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले होते. याचदरम्यान पलाश बाबतच्या अनेक चर्चेला उधाण आले होते. मात्र, याबाबत गेल्या तीन आठवड्यांमध्ये कोणीही अधिकृत भाष्य केले नव्हते. परंतु, रविवारी (दि.7) स्मृती आणि पलाश या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
स्मृतीने पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा झाल्या. मी खूप खासगी आयुष्य जगणारी व्यक्ती आहे. परंतु, मला हे देखील स्पष्ट करायचे आहे की, लग्न रद्द झाले आहे. मला हा विषय इथेच थांबवायचा आहे आणि तुम्ही सर्वांनीही हा विषय इथेच थांबवा. माझ्यासाठी नेहमीच आपल्या देशाचे सर्वोच्च स्थरावर प्रतिनिधित्व करणे हे आहे. भारतासाठी शक्य तितका काळ खेळत राहून आणखी विजेतीपदे जिंकावीत, असेच मला वाटते. माझे लक्ष नेहमीच यावर राहिल. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार, आता पुढे जायची वेळ आहे. तसेच पलाशने त्याच्या पोस्टमध्ये, मी माझ्या वैयक्तिक नात्याला मागे टाकून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
