अरे बापरे! …म्हणून त्याने रचला चोरीचा बनाव; फिर्यादीच निघाला आरोपी

। माणगांव । सलीम शेख ।
माणगांवमध्ये झालेला चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये फिर्यादीच आरोपी असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम प्रभाकर पारावे (वय 21, धंदा नोकरी, रा. चिंचवलीवाडी,गोरेगाव, ता. माणगाव) हा तळेगाव येथील यशगौरव कार्पोरेशनच्या राईस मिलचे पैसे कलेक्शन करण्यासाठी म्हसळ्यातील व्यापारी तसेच दुकानदारांकडे गेला होता. पैसे घेऊन परत येत असताना 31 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घाटामध्ये त्यांच्या ताब्यातील अ‍ॅक्टिवा स्कुटर अडवून पांढर्‍या रंगाच्या मारुती स्विफ्ट कारमधील अनोळखी इसमाने त्याची पैशांची बॅग चोरुन नेल्याची तक्रार त्याने पोलिसांत केली होती. त्या बॅगेत 5 लाख 57 हजार 339 रुपये असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत माणगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलीस वेगवेगळया ठिकाणी सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करीत असताना त्यांचा प्रथम पारावे याच्यावरच संशय आला.त्यामुळे त्यास विश्‍वासात घेवुन तपास केला असता फिर्यादी प्रथम पारावे याने लालसेपाटी व गाडी खरेदी करण्याची उद्देशाने गुन्हयाचा बनाव केल्याचे कबुल केले. पोलिसांनी या गुन्ह्यातील चोरीस गेलेली रक्कम हस्तगत केली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सतिष आस्वर, नितीन मोहीते, नवनाथ लहांगे, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, विक्रांत फडतरे, किर्तीकुमार गायकवाड, सहाय्यक फौजदार किशोर कुवेसकर, पोलीस हवालदार किरण तुणतुणे, मिलींद खिरीट, पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, शामसुंदर शिंदे, संतोष सगरे यांनी केली आहे.

Exit mobile version