सामाजिक न्याय भवन दुर्लक्षितच!

महामानवाच्या नावाची इमारत पाच वर्षांपासून ओसाड; नूतनीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि इतर वंचित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आज स्वतःच न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथे उभारलेली ही इमारत निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अवघ्या काही वर्षांत धोकादायक ठरली आणि गेल्या पाच वर्षांपासून पडिक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे वंचित घटकांच्या विकासासाठी निर्माण केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अक्षरशः ब्रेक लागल्याची भावना व्यक्त होत आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून गोंधळपाडा येथे ही भव्य इमारत उभारण्यात आली होती. यासाठी तब्बल 2 कोटी 73 लाख 94 हजार 700 रुपये खर्च करण्यात आले. 15 ऑगस्ट 2014 रोजी या इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी विविध महामंडळांची कार्यालये एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा उद्देश या प्रकल्पामागे होता.

इमारतीच्या तळमजल्यावर श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांची कार्यालये सुरू करण्यात आली होती. पहिल्या मजल्यावर समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय, सभागृह आणि कर्मचाऱ्यांची कार्यालये, तर दुसऱ्या मजल्यावर जात पडताळणी कार्यालय कार्यरत होते.

मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या चार वर्षांतच इमारतीतील गंभीर त्रुटी समोर येऊ लागल्या. स्लॅबचे भाग कोसळणे, भिंतींना मोठे तडे जाणे, पावसाळ्यात छत गळणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे कर्मचारी, विद्यार्थी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर 2019 मध्ये इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या अहवालात इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत सर्व कार्यालये स्थलांतरित करण्यात आली.

ज्या इमारतीमधून वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होणार होते, तीच इमारत आज ओसाड आणि दुर्लक्षित अवस्थेत उभी आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, देखभालीअभावी इमारतीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दरम्यान, काही व्यक्तींकडून या परिसराचा अनधिकृत वापर होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सामाजिक न्याय भवन की जनावरांचा गोठा?
गेल्या पाच वर्षांपासून बंद आणि पडिक अवस्थेत असलेल्या सामाजिक न्याय भवनाच्या दुरुस्तीबाबत किंवा नवीन इमारतीच्या उभारणीबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. परिणामी, इमारतीचा परिसर काही व्यक्तींकडून जनावरे व बकऱ्या बांधण्यासाठी वापरला जात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. सामाजिक न्यायाच्या उद्देशाने उभारलेल्या इमारतीचा वापर आज गोठ्यासारखा होत असल्याची परिस्थिती प्रशासनासाठी लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
कार्यकारी अभियंत्यांची टाळाटाळ
गोंधळपाडा येथील सामाजिक न्याय भवनाच्या नूतनीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, “माहिती घेऊन कळविते,” असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर या विषयावर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पुन्हा संपर्क साधूनही या प्रश्नावर त्यांच्याकडून उत्तर मिळाले नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Exit mobile version