। रसायनी । प्रतिनिधी ।
मखर सजावटीचे साहित्य कुठे ठेवले आहे, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मुलानेच वृद्ध आईच्या डोक्यात हातोडी मारून तिला गंभीर जखमी केले. ही घटना खालापूर तालुक्यातील नडोदे गावात घडली. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार येरुणकर याने त्याचे वडील तुळशीदास यांच्याकडे गणपतीच्या मखर सजावटीचे साहित्य कुठे ठेवले आहे, अशी विचारणा करत आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी वडिलांनी यंदा छोटा मुलगा गणपती बसवत असून सजावटीची आवश्यक तयारी करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, या उत्तरावरून तुषार याचा संताप वाढला आणि त्याने वडिलांसोबत वाद घालत त्यांना कानाखाली मारली. हा प्रकार पाहून वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आईच्या कपाळावर तुषार याने हातोडीने मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, वडिलांच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी तुषार येरुणकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत.
सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव
