दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धा
| बंगळुरु | वृत्तसंस्था |
दुलीप ट्रॉफी 2023 च्या अंतिम सामन्यात शेवटच्या दिवशी दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा दुसरा डाव 222 धावात संपवत सामना 75 धावांनी खिशात टाकला. दक्षिण विभागाने स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या पश्चिम विभागाला पराभावची धूळ चारत दुलीप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पश्चिम विभागात धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ, भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा, आयपीएल, गाजवणारा सूर्यकुमार यादव, शतकांचा रतीब घालणारा सर्फराज खान यांचा समावेश होता. मात्र तरी देखील पश्चिम विभागाला दक्षिण विभागासमोर शरणागती पत्करावी लागली. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण विभागाने हनुमा विहारीच्या 63 अन् तिलक वर्माच्या 40 धावांच्या जोरावर सर्वबाद 213 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पश्चिम विभागाच्या पृथ्वी शॉचा (65) अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाचा विद्वत कवेराप्पासमोर टिकाव लागला नाही.
कवेरप्पाने तब्बल 7 बळी घेत पश्चिम विभागाचा पहिला डाव 146 धावात संपवला. पुजाराने 9, सूर्यकुमार यादवने 8 तर सर्फराज खानन 0 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात दक्षिण विभागाने 230 धावा केल्या. त्यातही विहारीने सर्वाधिक 48 धावांचे योगदान दिले. पश्चिम विभागाला विजयासाठी 297 धावांची गरज होती. मात्र त्यांना 222 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यातही संघाचा कर्णधार प्रियंक पांचाळच्या झुंजार 95 धावा अन् सर्फराजच्या 48 धावांची खेळी सोडली तर इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. पुजारा 15 धावा तर सूर्यकुमार यादव 4 धावांची भर घालून परतला. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने दोन्ही डावात मिळून 24 तर सूर्यकुमार यादवने 12 आणि सर्फराज खानने 48 धावा केल्या. पृथ्वी शॉने दोन्ही डावात मिळून 72 धावांचे योगदान दिले.
कोण आहे विद्वथ कवेरप्पा?
विद्वथ कवेरप्पाकडे उमरान मलिकसारखा वेग नाही पण त्याच्याकडे अचूकता आहे. 24 वर्षीय कवेरप्पा कर्नाटककडून स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळतो. दुलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून तो सध्या खेळत होता. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 2021-22 च्या हंगामात कर्नाटकसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. कमी वेगामुळे त्याला पदार्पणातही विरोध होत होता. मात्र अवघ्या 12 सामन्यांत त्याने 49 विकेट्स घेतल्या आहेत. कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील गोनीकोप्पल येथील असलेल्या कवेरप्पाला आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने विकत घेतले होते, परंतु 2023 च्या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.