| अलिबाग | प्रतिनिधी |
नोकरीबरोबरच शैक्षणिक कामांसाठी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. अपुऱ्या कागदपत्रांसह काही त्रुटींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. हे प्रश्न कायमचे सोडविण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पुढाकार घेतला आहे. शिबिराच्या माध्यमातून त्रुटींचे निरसन करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अलिबाग येथील चेंढरे येथील आनंदनगर परिसरात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय आहे. या कार्यालयात जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थ्यांसह कर्मचारी जातात. प्रमाणपत्र वेळेवर मिळावे यासाठी समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयात शिबीरे घेऊन जागेवर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता अकरावी व बारावी (विज्ञान) या वर्गात शिकत असलेल्या व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शासकीय, निमशासकीय सेवतील कर्मचाऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन केले आहे. 30 सप्टेंबरपूर्वी दाखल केलेल्या ज्या अर्जदारांना प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यांच्यासाठी 26 ऑक्टोबर रोजी त्रुटी पूर्तता शिबीर घेतले जाणार आहे. या शिबिरातून प्रमाणपत्र मिळविताना असलेल्या त्रुटींचे निरसन करून अर्जदारांसह विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शिबीराचा जिल्ह्यातील अर्जदार, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी केले आहे. तसेच प्रमाणपत्र देण्याबाबत 31 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिम राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.






