द्रविड सरांकडून कानउघाडणी

अपयश अस्तित्वाची जाणीव करून देणारे
। केप टाऊन । वृत्तसंस्था ।
कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारण्याची नामुष्की ओढावल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड निश्‍चितच नाराज झाले. त्यांनी अपयशास कारणीभूत असलेल्या सर्वांची नावे न घेता कानउघाडणी केली. तसेच हे अपयश टीम इंडियाला अस्तित्वाची जाणीव करून देणारे आहे, असेही स्पष्ट मत द्रविड यांनी व्यक्त केले.
तिसर्‍या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिका दौर्‍याची सांगता होत असताना द्रविड स्वतः पत्रकार परिषदेत आले आणि त्यांनी टीम इंडियाच्या सर्व कमकुवत बाजूंवर बोट ठेवले. अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी काही खेळाडू प्रयत्नशील असतात, त्यांना आम्ही संधी देतो आणि आश्‍वस्तही करतो, पण त्याचवेळी त्यांनीही निर्णायक योगदान देऊन आमचा विश्‍वास सार्थ ठरवायचा असतो, असे सांगणार्‍या राहुल द्रविड यांनी कोणाचेही नाव घेतले नाही; परंतु त्यांचा रोख श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्याकडे होता. श्रेयस अय्यरला तिन्ही सामन्यांत संधी देण्यात आली; परंतु संघाला गरज असताना त्याने विकेट स्वतःत बहाल केली. रिषभ पंतने तर दुसर्‍या कसोटीप्रमाणे अंतिम एकदिवसीय सामन्यात पुन्हा बेजबाबदार फटका मारून संघालाही अडचणीत आणले.

फलंदाजीत अपयश
तिन्ही सामन्यांत 20 ते 40 या मधल्या षटकांत आमच्या फलंदाजांना लय मिळवता आली नाही. मधल्या फळीत अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. तीनपैकी दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने 290 च्या आसपास धावा केल्या होत्या. 30 व्या षटकापर्यंत आम्ही चांगला पाठलाग करत होतो, परंतु महत्त्वाच्या क्षणी सुमार फटके मारून फलंदाजांनी विकेट गमावल्या.

अष्टपैलू खेळाडू हवा
संघाला समतोल साधण्यासाठी चांगल्या अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचे बोलताना द्रविड यांनी हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांचा उल्लेख केला; पण पहिल्या दोन सामन्यांत शार्दुल ठाकूरने आणि तिसर्‍या सामन्यात दीपक चहरने हार्दिक आणि जडेजा यांच्याएवढीच भरवशाची फलंदाजी करून दाखवली.

गोलंदाजांकडूनही निराशा
फलंदाजांप्रमाणे गोलंदाजही डावाच्या मध्यावर दक्षिण आफ्रिकेच्या जमलेल्या भागीदारी फोडण्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात दोन, तर तिसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून एक शतकी खेळी करण्यात आली.

Exit mobile version