। पनवेल ग्रामीण। प्रतिनिधी ।
पनवेल ते गव्हाण फाटा मार्गावर जेएसडब्ल्यू कंपनीसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाने बंद पडलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना 21जून रोजी दुपारी घडली. या अपघातात रिक्षामधील दोन महिला प्रवासी जखमी झाल्या असून, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर हवेचा पाईप अचानक निघाल्याने चालकाने ट्रेलर रस्त्याच्या कडेला थांबवला होता. याच वेळी दुपारी सुमारे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास रिक्षावरील चालकाने रिक्षा भरधाव वेगाने चालवत बंद उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षामधील दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात 21जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.







