। रसायनी । राकेश खराडे ।
लोहप-इसांबे रत्यावरील लोहोप थांबा येथे मंगळवारी (दि.25) रात्री अकराच्या सुमारास मोठा अपघात झाला. वाशिवलीहून इसांबे गावाच्या दिशेने जाणार्या खाद्यतेल वाहतूक करणार्या भरधाव टँकरने (एमपी 09 एचएच 8688) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कार व एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एमएच 46 सीएच 7009 व एमएच 46 एएल 1420 या दोन वॅगनार कार व एमएच 46 सीबी 3994 ही दुचाकी जबरदस्त चिरडली गेली.
या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर मोठा आक्रोश केला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला संतप्त ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. लोहोप, कोपरी, दांडवाडी, तळवली येथील रहिवासी या अपघातामुळे संतप्त झाले आहेत. इसांबे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत असल्याने येथे अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अरुंद रस्त्यांवर गतीरोधक नसल्याने भरधाव वेगाने जाणार्या वाहनांमुळे हा भाग अपघाती क्षेत्र बनला आहे.
गतीरोधक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा माजी उपसरपंच बबन पाटील यांनी सार्वजानिक बांधकाम विभागाला दिला आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आणि सूर्यकांत ठोंबरे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. पण, प्रशासन गतीरोधक बसवणार की आणखी एका अपघाताची वाट पाहणार? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.