माणगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

। माणगाव । प्रतिनिधी ।
उत्तर प्रदेशातील लखिमपुर-खेरी येथे शेतकर्‍यांना वाहनाने चिरडून टाकण्याचा घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला माणगावात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस, आय काँग्रेसचे कार्यकर्ते यानिमित्ताने माणगावात एकत्रित येऊन रस्त्यावर उतरले होते.
सकाळपासून काही अत्यावश्यक वस्तुंची दुकाने वगळून बहुतांशी दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद माणगावात दिला. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेनेचे माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, शहरप्रमुख अजित तारलेकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष गणेश चव्हाण, शहराध्यक्ष महामुद धुंदवारे, माजी शहराध्यक्ष सचिन देसाई, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे, बाळा पवार आदींनी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरून बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Exit mobile version