60हून अधिक दाखल्यांचे वाटप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महसूल व वन विभाग गतिमान प्रशासन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान कार्यक्रम रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावे, वाड्यांमधील गरीब, गरजूंना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले आहेत. यावेळी अलिबाग तालुक्यातील रामराज मंडळातील गावे, वाड्यांतील असंख्य ग्रामस्थ व महिलांना दाखले वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे, समाधान शिबिरातून गरीबांना दाखल्यांचा आधार मिळाल्याचे चित्र दिसून आले.
शिधापत्रिकांपासून वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यांची ही धावपळ कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान सुरू करण्यात आले. थेट नागरिकांना त्यांच्या घरच्या घरी कार्यक्रमातून दाखले देण्याचा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी रामराज मंडळातील गावे, वाड्यांमधील नागरिकांना दाखले देण्यासाठी बेलोशी ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आला. या शिबिरांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे दोन चौकशी अर्ज लाभार्थी, आठ उत्पन्न दाखले, दहा जातीचे दाखले, नऊ जन्म मृत्यू दाखले, एक पिवळी शिधापत्रिका, 17 जिवंत सातबारा उतारे व 12 जातीचे दाखले असे एकूण 60 हून अधिक दाखले वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी आर.एन. मांढरे, बेलोशीचे ग्रामविकास अधिकारी शैलेश नाईक, ग्राम महसूल अधिकारी शशिकांत कांबळे, अक्षय देशमुख, पायल पाटील तसेच महसूल सेवकमोहन लोभी, महेंद्र वादळ सामाजिक कार्यकर्ता जनू शिद तसेच लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.