उरणमध्ये डेंग्यूचा फैलाव

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण शहर, तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक डेंग्यूग्रस्त रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी तालुका वैद्यकीय अधिकारी वर्गाने रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
गेली दिड वर्ष उरण तालुक्यातील रहिवाशांना कोरोनाच्या महामारीने ग्रासले आहे. अशा रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी वर्ग अयशस्वी ठरल्याने सध्या उरण शहर, तालुक्यातील ग्रामीण भागात वातावरणातील बदलाबरोबर ठिकठिकाणी अस्वच्छता, मच्छरांचा प्रादुर्भाव, दुषित पाणीपुरवठा या बाबतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, मलेरिया, काविळ या सारख्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
उरण शहर, तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. तरी तालुक्यात उद्भवणार्‍या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, वैद्यकीय विभाग यांनी ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी डेंग्यूग्रस्त रुग्णांचे नातेवाईक, मित्रमंडळी करत आहेत.

Exit mobile version