| पनवेल | प्रतिनिधी |
श्री ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 27 वे पुष्प पनवेल येथील गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रात संपन्न झाले. या कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवश्री नवघरे- भिडे यांची गायन सेवा संपन्न झाली.
विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतलेल्या देवश्री यांनी संगीत सभेची सुरुवात गावती या रागाने केली. धन धन बालमा मोरे घर आये ही विलंबित एकातालालीत बंदिश गाऊन त्यानंतर द्रुत एकतालातील मोसे मत रोको सैय्या ही बंदिश सादर केली. त्यानंतर तिलक कामोद रागामध्ये एक तराणा त्यानी सादर केला. नंतर संगीत मानापमान मधील मखरा तो प्रेमा ना हे नाट्यगीत सादर करून रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. यानंतर त्यांनी कबीर यांचे निर्गुणी भजन आणि संत एकनाथ महाराजांचा या पंढरीचे सुख हा अभंग सादर केला. कान्हा का रे ऐसी माया या भैरवीने त्यांनी संगीत सभेची सांगता केली. त्यांना नंदकुमार कर्वे यांनी हार्मोनियम, मिलिंद नाईक यांनी तबला, संतोष खैरे यांनी पखवाज व चैतन्य कोशे यांनी तालवाद्यसाथ केली. समीर सोमण यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. ही सभा यशस्वी होण्यासाठी मठातील कार्यकर्ते व मासिक संगीत सभेचे आयोजक यांनी मोलाचे योगदान दिले.