श्रीवर्धन पर्यटन खड्ड्यात

दिवेआगर पर्यटन प्रवास बनला खडतर

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली वाकडा पूल ते दिवेआगर पर्यटन स्थळाला जोडणारा मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळांशेजारी रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डेमय प्रवासाला कंटाळले आहेत.

तालुक्यातील पुणे, मुंबई या शहरातील येणार्‍या वाहनांसाठी दिवेआगर अशा मुख्य पर्यटनस्थळाला खाडीलगत जोडणारा हा मार्ग सध्या खिळखिळा बनला आहे. पर्यटनाला गती मिळावी यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका आग्रही ठरत आहे. मात्र, इकडे रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांकडे अद्याप दुर्लक्ष आहे.

सद्यःस्थितीत अपूर्ण डांबरीकरणामुळे दिवेआगर मार्गावरील टोकदार खड्डी बाहेर आली आहे. या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय पर्यटन दृष्टीकोनातून महत्त्वाचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने पर्यटक संताप व्यक्त करतात. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती वा डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारक व येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version