एसटी महामंडळाची घोषणा; तब्बल 5,500 विशेष गाड्यांची सोय
| रायगड | प्रतिनिधी |
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुकर प्रवासासाठी एसटीने दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणत्याही गावातून किमान 40 किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास, त्यांना थेट त्यांच्या गावातूनच पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. वारीसाठी एसटीने साडेपाच हजार विशेष बसचे नियोजन केले आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना होत असतात. या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने यंदा राज्यभरातून 5 हजार 500 विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ वारीच्या काळातही प्रवाशांना मिळणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा असेल. तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व महिला प्रवाशांना तिकिटाच्या दरात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि वृद्ध वारकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा
वारीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे तात्पुरती बसस्थानके उभारली जाणार आहेत. या बसस्थानकांवर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज स्वच्छतागृहे, आपत्कालीन आरोग्य सुविधा आणि माहिती केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना योग्य दिशा समजावी यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून मदतीसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चोख नियोजन
वारीच्या काळात रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक 24 तास सेवा देणार आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी वारकऱ्यांनी आपल्या प्रवासाचे आगाऊ आरक्षण करावे. विशेष बस हवी असल्यास भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी (डेपो) संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने प्रवाशांना केले आहे.






