| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अलिबाग-वावे या मार्गावर कुरूळ येथील क्षत्रिय समाज हॉलजवळ एका एसटीचालकाने दुचाकीला धडक दिली. ही घटना शुक्रवारी (दि.13) दुपारच्या सुमारास घडली असून यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाला आहेत.
अलिबाग आगारातील वावे-अलिबाग (एमएच-20-बीएल-3218) ही एसटी वावेकडून अलिबागकडे जात असताना कुरूळजवळील क्षत्रिय समाज हॉलजवळ एसटी चालकाने विरूद्ध दिशेने गाडी चालवत समोरून येणाऱ्या (एमएच-06-सीजे-7336) दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून मागे बसलेला सहकारी देखील जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही गाडींचे नुकसान झाले आहे. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी व एसटी चालकाने त्या दुचाकीस्वाराला रस्त्यातून बाजूला नेले. मात्र, या अपघाताला एसटीचालकच कारणीभूत असल्याचे प्रत्यक्ष दर्शींकडून बोलले जात आहे. त्यामुळे आगार प्रमुख त्यावर कडक कारवाई करणार का, याकडे दुचाकीचालकासह इतर प्रवाशांचे लक्ष लागले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ते करीत आहेत.