| पनवेल | प्रतिनिधी |
महाविद्यालयातील प्राचार्याकडून होणाऱ्या शिवीगाळ आणि त्रासाला कंटाळून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील पोयंगे गावातील एका खासगी महाविद्यालयात घडली आहे. वसतीगृहातील खोलीत कमरपट्ट्याने खिडकीच्या गजाला गळफास घेऊन त्यानं आयुष्य संपवलं. या प्रकरणी मृत तरूणाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत प्राचार्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूण हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून, तो पनवेल येथील पोयंगे गावातील एका खासगी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगचं शिक्षण घेत होता. मृत विद्यार्थ्याच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून प्राचार्याकडून विद्यार्थ्यावर जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. तसेच इतरांसमोर अपमान केला जात होता. याच मानसिक छळाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहोत.