सेंट झेवियर शाळेतील विद्यार्थ्याला त्रास देणे पडले महागात

चेअरमनसह मुख्याध्यापक, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

। महाड । प्रतिनिधी ।

महाड मधील सेंट झेवियर्स शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला मागील नऊ वर्षापासून सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या शाळेच्या चेअरमनसह मुख्याध्यापक व दोन शिक्षकांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाच्या पालकांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.

महाड तालुक्यात शिरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये सेंट झेवियर्स नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये सन 2015 पासून आज 2023 पर्यंत एक मुलगा या शाळेत शिक्षण घेत होता. मात्र सन 2015 ते 2023 या कालावधीत शिक्षण घेत असताना तो वारंवार आजारी पडत असल्याकारणाने तो शाळेत गैरहजर राहत होता. याचा राग ठेवून शाळेतील शिक्षक या विद्यार्थ्यास वारंवार अन्य विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक देत असत. तसेच, अनेक वेळा विद्यार्थ्यांसमोर मारहाण देखील करीत असत.

सेंट झेवियर्स शाळेतील शिक्षक वनारसे यांच्या पाल्यास वारंवार मारहाणीचा प्रकार करीत असल्याने अखेर त्यांच्या पाल्याने सदरचा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यावेळी विद्यार्थ्यांचे पालक वनारसे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका डिसोजा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांना जाब विचारण्याऐवजी शाळेच्या मुख्याध्यापिका डिसोजा व चेअरमन डिसोजा यांनी विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक अपमानस्पद वागणूक दिली. सेंट झेवियर्स शाळेच्या या प्रकाराबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार दाखल होत नसल्याने वनारसे यांनी याबाबत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने पनवेल येथील बालकल्याण विभागाकडे याबाबतची सदरची तक्रार पाठवली.

पनवेल येथील बालकल्याण विभागात याबाबत सुनावणी चालू असताना महाड शहर पोलिसांनी तक्रारदार वनारसे यांना बोलावून सदरची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करून घेतली. महाड शहर पोलिसांनी सेंट झेवियर्स शाळेचे शिक्षक अमित अंधेरे व सोनाली शिंदे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डिसोजा व चेअरमन डिसोजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

Exit mobile version