कामकाजात सुसुत्रता आणण्यासाठी निर्णय, 147 अधिकार्यांचा समावेश
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
जवळ जवळ एका दशकानंतर सिडको महामंडळात तब्बल 147 अधिकारी कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोत उघडकीस आलेल्या 29 बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणानंतर सिडकोतील महत्वाच्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजेच 360 डिग्री बदल्या झाल्याचे दिसून येत आहे.
सिडकोत कार्यरत असलेल्या वर्ग 2, 3 व 4 मधील तब्बल 147 अधिकारी व कर्मचार्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. यात विविध विभागांतील 31 लिपिक/टंकलेखक, 16 कार्यालयीन सहाय्यक, 15 क्षेत्र अधिकारी,13 ड्राफ्ट्समन,14 सर्वेयर, 10 स्टेनोग्राफर व 48 शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या 29 बोगस कर्मचारी घोटाळ्याचा हा परिणाम असल्याचीचर्चा सिडकोत जोरात सुरू आहे.
बोगस कर्मचारी प्रकरणामुळे सिडको महामंडळाची झालेली बदनामी लक्षात घेऊन डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी व एकाच विभागात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचार्यांची उचल बांगडी करण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी त्यांनी विविध विभागातील तब्बल 147 अधिकारी-कर्मचार्यांची बदली करून आपल्या कार्यपद्धतीची चुणूक दाखविली. त्यांनी उचललेले हे पाऊल सिडको महामंडळाच्या प्रशासकीय कामकाजात सुसुत्रता आणण्यात किती यशस्वी ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आठ दिवसापूर्वी सिडकोतील 4 उच्च पदस्थ अधिकार्यांच्या बदल्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केल्या. यात मुख्य लेखा अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीवर आलेल्या धनराज गरड यांची सिडकोचे वित्तीय सल्लागार म्हणून व्यवस्थापकीय संचालकांनी बदली केली आहे. तर गरड यांच्याकडे असलेला कंपनी सचिवाचा अतिरिक्त कार्यभार देखील महाव्यवस्थापक गृहनिर्माण फैय्याज खान यांच्याकडे देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे फैयाज खान यांच्याकडे महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) सोबतच व्यवस्थापक कार्मिक हा अतिरिक्त कार्यभार ते आधीपासूनच सांभाळत आहे. आणि त्यांच्याच कार्यकाळात सिडकोतील बोगस कर्मचारी घोटाळा उघडकीस आला आहे. धनराज गरड यांना हटवल्यामुळे आता लेखा अधिकारी अस्मिता दळवी यांच्यावर मुख्य लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.