सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी हल्लाप्रकरणी आरोपींना पोलिसांकडून अटक; कामबंद आंदोलन मागे
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पुणे येथील सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर सुरू करण्यात आलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला अखेर यश आले आहे. पोलिसांनी हल्लाप्रकरणातील आरोपींना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून, विभागाचे नियमित कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.
पुणे येथे शासकीय कर्तव्य बजावत असताना सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला करून अमानुष मारहाण केली होती. घटना घडून अनेक तास उलटूनही आरोपींवर गुन्हा दाखल न झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. संघटनेच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपींना संरक्षण मिळेल अशा स्वरूपाचे कलम लावल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. रायगड जिल्ह्यातही सोमवारी (दि. 20) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष विक्रांत आंब्रस्कर, उपाध्यक्ष एम.डी. पवार, सचिव पी.एस. पालवणकर, खजिनदार सोनम गोळे, धन्यता पावशे, पी.एस. दळवी, जे.जे. बारे, एस.एच. पिंपळे, जी.एस. चव्हाण यांच्यासह शेकडो अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरोपींवर कठोर कलमांखाली कारवाई करावी, संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सर्व कार्यालयांना महाराष्ट्र सुरक्षा दलाची सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या केल्या होत्या.
या आंदोलनामुळे राज्यभरात दस्तनोंदणी, मालमत्ता खरेदी-विक्रीसह हजारो व्यवहार ठप्प झाले होते. परिणामी, कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढालही खोळंबली होती. अखेर पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेत नियमित शासकीय कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. शासनाने तातडीने दखल घेऊन न्याय्य कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही 20 जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
विक्रांत आंब्रस्कर,
जिल्हाध्यक्ष, नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना, रायगड.
