| कर्जत | प्रतिनिधी |
काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरिता एसी लोकल सुरू केल्या आहेत; परंतु एसी लोकल बदलापूरपर्यंत येत आहे. या एसी लोकल कर्जतपर्यंतसुद्धा सुरू कराव्यात, अशी मागणी कर्जतकर प्रवाशांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने एसी लोकल सुरू केल्या आहेत. या लोकलला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या लोकल बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येत आहेत. या लोकलची सुविधा कर्जतच्या प्रवाशांनासुध्दा मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगिलाल ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पत्र पाठवून विचारणा केली असता. कर्जतसाठी एसी गाड्या सुरू करता येतील, मात्र ज्या लोकल कर्जतसाठी आहेत, त्यातील लोकल एसी म्हणून सुरू करण्यात येतील. जादा लोकल गाड्या एसी लोकल म्हणून सुरू करण्यात येणार नाहीत, असे उत्तर दिले आहे.
असे केल्यास प्रवाशांमध्ये नाराजी उद्भवून उद्रेक होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाचे हे धोरण चुकीचे आहे. दोन लोकलमध्ये खूप वेळाचे अंतर आहे. त्या मधल्या वेळेत प्रवाशांच्या मागणीनुसार एसी लोकल सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल व रेल्वे प्रशासनाचे आर्थिक उत्पन्नही वाढेल. काही लोकल मध्ये एक-सव्वा तासाचे अंतर आहे. त्यामध्ये गर्दीच्या वेळी या एसी लोकल सुरू कराव्यात. अशी मागणी करण्यात येत आहे.
कर्जतसाठी एसी लोकल सुरू केल्यास स्वागतच आहे. या लोकल सुरू करताना सध्या सुरू असलेल्या कोणत्याही लोकलचे रूपांतर एसी लोकलमध्ये नसावे. त्यासाठी जास्त अंतराच्या वेळेत या नवीन एसी लोकल सुरू कराव्यात.
पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ता