। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ग्रामीण भागांमध्ये अंधार आहे. दरम्यान, वीजपुरवठा तात्काळ सुरु करा, असे निर्देश खा. सुनील तटकरे यांनी महावितरणला दिले. अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यात सुमारे 810 ग्रामपंचायती आहेत. त्यातील मोेठ्या संख्येने असणार्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी वीज बिल भरणा न केल्याने वीज वितरण विभागाने पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. सुरुवातीला सरकारच पथदिव्याचे वीज बिल अदा करत होते. पुढे जिल्हा परिषदेच्या 15 व्या वित्त आयोगातून वीज बिल अदा करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना होत्या. मात्र, काही ग्रामपंचायतींकडे बर्याच वर्षांपासूनची थकबाकी असल्याने चांगलीच अडचण निर्माण झाली.
वेळेवर बिलाची आकारणी न झाल्याने वीज वितरण विभागाने ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यातील काही ग्रामपंचायतींनी बिल भरल्याने वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला. मात्र, काही ग्रामपंचायतींची अद्यापही खंडित आहे. याबाबत ग्रामपंचायतींचे सरपंच हे खासदार तटकरे यांना भेटले. त्यानंतर तटकरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी या विषयावर चर्चा केली. नंतर तटकरे यांनी महावितरणचे आय.ए. मुलाणी यांना गुरुवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरु करण्याचे निर्देश दिले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अकरा वर्षांपासून सुरु आहे. अद्यापही हे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. याआधी देशात असे कोणत्याच प्रकल्पाचे काम रखडलेले नाही, अशी खंत खासदार तटकरे यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात येतात. मात्र, महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांचा प्रवास त्रासादायक होतो. पहिल्या टप्प्यातील काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. रायगडमधून जाणारा सागरी महामार्ग, नव्याने होणारा ग्रीनफिल्ड कोकण महामार्ग याबाबत त्यांनी माहिती दिली. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सर्वांनी गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा, गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.