दोन महिलांच्या पायाला फ्रॅक्चर; जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा सरकारी रूग्णालयात रुग्णांना भेटायला आलेल्या महिला पाय घसरुन पडल्याची घटना घडली. रुग्णालयातील बाथरुमध्ये पाणी साचल्याने सदरचे ठिकाण निसरडे झाले आहे. दोन्ही महिलांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयाची अवस्था बिकट असल्याची माहिती मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत पाटील यांनी दिली. हे प्रकरण समोर आणून त्यांनी रुग्णालयातील परिस्थिती दाखवली आहे.
सोमवारी (दि. 6) रूग्णालयात एक आजी आणि एक तरूण महिला दुसर्या मजल्यावरील विभागात रुग्णांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी तेथील दोन वेगवेगळ्या बाथरूममध्ये पाणी साचले होते. त्या ठिकाणी पाणी साचल्याने सदरची जागा निसरडी झाल्याने त्यांचा पाय घसरुन त्या पडल्या. त्यांच्या पायाला फॅक्चर झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
अपघात विभागातून पेशंट वॉर्डमध्ये नेण्यासाठी वापरल्या जाणार्या व्हिलचेअरची दुरवस्था झाली आहे. त्या दोन्ही चेअरला फूटरेस्ट नाही आणि त्यामुळे पेशंट बसल्यानंतर त्यांना आपले पाय सांभाळणं जास्त जिकिरीचं होत असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. जनतेला रुग्णालयात चांगल्या प्रकारे सुविधा मिळाव्यात म्हणून मनसे सतत प्रयत्न करत राहील, असेही ते म्हणाले. दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.