। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड पंचक्रोशीत मुंबई-गोवा महामार्ग तसेच मुरूड-पुणे राज्यमार्गावर तळवली ते खांब तसेच कुडली ते संभे आदी परीसरात असंख्य उनाड गुरे फिरत असतात. वाहनांच्या धडकेने ही गुरे मृत्युमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होत असतात. काहीवेळा दुचाकीस्वार सुद्धा या गुरांच्या धडकेने नेहमीच जखमी होत असतात. या अपघातात जखमी झालेल्या जनावरांना प्राणी मित्र व सामाजिक कार्यकर्ते तात्पुरता उपचार करतात. परंतु, यावर प्रशासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच, आजुबाजुच्या तालुक्यात सध्या गोवंश आणि गोमांस तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. ही उनाड गुरे म्हणजे गौतस्करांना आयती संधीच उपलब्ध होते असल्यामुळे आपल्या परीसरात अश्या प्रकारची गोवंश हत्या झाल्यास धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व घटनांना आवर घालण्यासाठी आपण या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देऊन कायम स्वरूपी उपाययोजना करावी, अशी विनंती कोलाड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा असंख्य नागरिकांकडून रोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रफुल्ल बेटकर, विजय शिंदे, अजय लोटणकर, भरत सातांबेकर, स्वप्निल महाबळे, प्रविण शिंदे उपस्थित होते.