। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शासनाच्या धोरणाविरोधात राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसर 17 ऑगस्टपासून राज्यासह रायगड जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत काम करणार्या अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेले मोबाईल परत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अंगणवाडी सेविका आपले मोबाईल परत करणार आहेत. अंगणवाडीची संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये भरतांना अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडत आहे. इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची सक्ती बंद करून मराठीमध्ये माहिती भरण्याची मागणी होत आहे.
पोलिओ लसीकरण असो की मग आत्ता आलेली कोरोनासारखी महामारी त्या सर्वांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण व माहिती संकलनचे काम या अंगणवाडी सेविका करतात. या अंगणवाडी सेविकापैकी अनेक सेविका या काही वर्षात सेवानिवृत्त होतील. त्यांचे त्यावेळचे शिक्षण देखील कमी आहे. बर्याच सेविकाना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. परंतु जिल्हा परिषदने सर्वेक्षणाची सर्व माहिती इंग्रजीत भरणे सक्तीचे केले आहे, ही माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडत आहे. परंतु आपली मुस्कटदाबी सहन करीत अंगणवाडी कर्मचारी या माहिती भरत आहेत. या माहितीत काही चूक झाली तर याला जबाबदार कोण? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेले मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे आहेत. अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल हे डिलीटी पॅनासॉनिक कंपनीचे असून हा मोबाईल वापरताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामागे नेमकं कारण काय, याबाबत अद्यापही शंकाच आहे. मोबाईल 15 ते 20 मिनिटे चालल्यानंतर अतिशय गरम होऊन बंद पडतो. बर्याचदा भरलेली माहितीही डिलीट होते, असे काम सुरू असताना मोबाईल हँग होउन बंद पडतो. तसेच यामधील महत्वाची समस्या म्हणजे अंगणवाडी सेविका वयोवृध्द असून त्यांना फारसे इंग्रजी येत नसल्याने काम करताना खूप समस्या येतात. वेळोवेळी शासनाकडे इंग्रजीऐवजी मराठीचा वापर होण्याची मागणी करूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच मोबाईलमध्ये काय बिघाड झाला तर त्याचा खर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा आर्थिक भुर्दड बसत आहे.
दरम्यान पेण तालुक्यातील 298 अंगणवाडी सेविका आपल्या कार्यालयात जाउन मोबाईल जमा करणार आहेत. या विषयी जाणून घेण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे वेळोवेळी अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. शेवटी शासनानेच निर्णय घ्यायचा आहे.
अंगणवाडी सेविकांना 2 वर्षांपूर्वी जे पॅनॉसॉनिक कंपनीचे मोबाईल दिले आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. अनेक जणींचे मोबाईल सद्य स्थितीत बिघडले आहेत. त्याच्या दुरुस्तीचा खर्च ही जास्त आहे व तो खर्च अंगणवाडी सेविकांकडूनच घेतला जातो. अत्यंत कमी मानधनात काम करणार्या अंगणवाडी सेविकेला हा मोबाईल दुरुस्तीचा खर्च परवडण्यासारखा नाही.
जिविता सूरज पाटील, अलिबाग तालुका प्रमुख, राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती