stay safe! बाळगंगा नदीचे पाणी घुसले घरात; नागरिकांनी रात्र काढली जागून

। खरोशी । वार्ताहर ।
मुसळधार पावसाने पेण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले असून सतत दोन ते तीन दिवस पावसाने रौद्ररूप धारण केल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि गावातील घरघरात पाणी घुसायला सुरुवात झाली.

बाळगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे खरोशी गावकर्‍यांना 1989 आणि 2006 महापूराची आठवण आली असल्याने मायभगिनी रात्रीपासूनच भयभीत झाल्या आहेत. बाळगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील आणि ओहोळाच्या आसपासच्या घरात पाणी घुसल्याने अनेकांचे खूप नुकसान झाले. महापुरामुळे या गावातील 30 ते 40 घरांमध्ये पाणी घुसले आहे.

गावातील वाहतूक व्यवस्था पुर्णपणे विस्कळीत झाली असून अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने घरात माती व चिखल आला आहे. रात्री साडेतीन वाजल्यापासून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी ओसरले नाही तर मात्र गावकर्‍यांना खूप नुकसान सोसावे लागेल. तसेच या महापूराच्या पाण्यामुळे घरातील सामानाची नासधूस झाली आहे. वीज गायब आहे.

शेजारील दुरशेत, बळवली, जिते यांच्यासह तांबडशेत, जोहे, कळवे, दादर, कोपर, उर्णोली, सोनखार आदी गावातील लोकांचे तसेच गणपती कारखानदारांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावागावातून नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version