अदानीचे जहाज समुद्रातच अडवू ; विजय गिदी यांचा इशारा

शेकडो नौकांसह सागरी आंदोलन करणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील अदानी दिघी पोर्टचे सुरू असलेले काम बेकायदेशीर आहे. येथील स्थानिक मच्छिमारांची दिघी पोर्ट प्रशासनाने फसवणूक केली आहे. मच्छिमारांच्या जागेवर अतिक्रमण करुन जागा बळकाविली असून, त्याबदल्यात योग्य मोबदलाही दिलेला नाही. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करुनदेखील प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. व्यवस्थापनाच्या या आडमुठ्या भूमिकेविरोधात शेकडो यांत्रिक नौकांसह समुद्रात आंदोलन करुन अदानींचे एकही जहाज किनार्‍याला लागू देणार नाही, असा खरमरीत इशारा महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई संचालक तथा श्री महालक्ष्मी मच्छिमार सोसायटी, राजपुरीचे चेअरमन विजय गिदी यांनी अदापनी पोर्टला दिला आहे.

यावेळी ते म्हणाले की, अदानी ग्रुपचे दिघी येथे काम सुरू असून, त्याविरोधात शेकडो मच्छिमारांनी वेळोवेळी एल्गार केला आहे. स्थानिक मच्छिमारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात 8 फेब्रु. 2021 ते 31 ऑक्टो. 2022 या कालावधीत तब्बल 13 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला असून, येथील मच्छिमारांच्या प्रश्‍नांची जाणीव त्यांना करुन दिली आहे. परंतु, आजतागायत एकाही पत्राला उत्तर देण्याची तसदी दिघी पोर्ट प्रशासनाने घेतलेली नाही. दिघी पोर्टचे काम अद्याप सुरू असून, मोठ मोठी जहाजे जेट्टीपर्यंत येण्यासाठी त्याठिकाणी समुद्रात खोलीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे.

दरम्यान, उत्खनन सुरू असताना स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच मत्स्यदुष्काळामुळे हवालदिल झालेल्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये लक्ष्मण नारायण नागोठकर यांचे 90 हजारांचे तर जयवंत नारायण आगकर यांचे 19 हजारांचे जाळी व सामानाचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई अद्याप पोर्ट प्रशासनाने दिलेली नाही. ही भरपाई तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे लावून धरलेली असताना याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष चालविलेले आहे. त्यामुळे मच्छिमारांमध्ये याविरोधात तीव्र संतापाची लाट आहे. समुद्रात होत असलेल्या उत्खननामुळे मच्छिमारांची हक्काची जागा नष्ट होत झाली असून, मासेमारीतून मिळणारी पापलेट, कलेट, शेवंड, कोलंबी, जिताडा, रावस तसेच खाडी किनारी मिळणारी कालवे, शिंपल्या आदी प्रकारची मिळणारी मच्छी गायब झाली असल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण झाले आहे. याबाबत पोर्ट प्रशासनाविरोधात आवाज उठविण्यात आला असून, प्रत्येक वेळी थातुरमातुर आश्‍वासन देऊन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप श्री. गिदी यांनी केला आहे.

दरम्यान, 27 ऑक्टोबर रोजी सागरी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी पोर्ट प्रशासनाने स्थानिक मच्छिमारांसोबत बैठक लावली. त्यावेळी 15 दिवसांच्या आत सामंजस्य कराराबाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन स्थानिक पोर्ट प्रशासनाकडून देण्यात आले आहे. परंतु, आतापर्यंतचा इतिहास पाहता, पोर्ट प्रशासन निर्णयावर ठोस कार्यवाही करेल, अशी आशा नाही. म्हणूनच पोर्ट प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी शेकडो यांत्रिक नौकांच्या सहाय्याने सागरी आंदोलन लवकरच छेडण्यात येईल, असा इशारा शेवटी विजय गिदी यांनी दिला आहे.

अन्यथा काम बंद पाडू
आगरदांडा टर्मिनलचे काम थोड्याच दिवसात सुरू होणार असल्याचे समजले आहे. परंतु, या टर्मिनलचे समुद्रामध्ये लांबी-रुंदीचा भराव किती असेल, ते अद्याप समजलेले नाही. त्यामुळे मच्छिमारांकरिता असलेली समुद्रातील जागा कमी होणार आहे. हे होणारे अतिक्रमण तात्काळ थांबवावे, अन्यथा आम्ही काम बंद पाडू. जर भराव करुन जागा वाढत असेल, तर त्या वाढीव जागेचा मोबदला स्थानिक मच्छिमाांना मिळावा, अशी मागणी विजय गिदी यांनी केली आहे.

प्रशासनासमोर मागण्या
23 ऑगस्ट रोजी पोर्ट प्रशासनाबरोबर सामंजस्य करार करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबास शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी, शेतकर्‍यांप्रमाणे बाधित मच्छिमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला मिळावा. चॅनलची मार्गिका स्थिर करण्यात यावी, ज्येष्ठांना दिघी पोर्टकडून पेन्शन लाग करावी. खाडीमध्ये उत्खनन करण्याअगोदर संस्थेस कळविण्यात यावे. अशा जवळपास 23 मागण्यांचा समावेश आहे. त्या मागण्यात तात्काळ मान्य करण्यात याव्यात, असेही श्री. गिदी यांनी सूचित केले आहे.

दिघी पोर्टनी मच्छिमारांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले, तर शेकडो यांत्रिक नौका घेऊन सागरी आंदोलन करुन येणारे दिघी पोर्टची जहाजे अडविण्यात येतील, तसेच आगरदांडा टर्मिनलचे आतील व बाहेरील काम करु देणारा नाही.

विजय गिदी
चेअरमन, श्री महालक्ष्मी मच्छिमार सोसायटी, राजपुरी
Exit mobile version