बालपणापासून राष्ट्रपतीपदापर्यंतचा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास संघर्षमय तसाच प्रेरणादायी आहे. राजकीय प्रवासात घेतलेल्या निर्णयावरून त्या ‘रबर स्टॅम्प’ ठरणार नाहीत, हे नक्की. त्यांनी शिक्षणासाठी महत्त्वाची पावलं उचलली. आदिवासींच्या हिताची चर्चा केली आणि सरकारच्या निर्णयांवरही प्रश्न उपस्थित केले. आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांवरून, त्या हक्कांशी तडजोड करणार नाही आणि लोकांना हक्कांपासून वंचित ठेवणार नाहीत, असं दिसतं.
मोदी यांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करून देशाला केवळ आश्चर्यचकित केलं होतं; आता या पदी झालेल्या त्यांच्या निवडीने अवघ्या देशाला कौतुकाची नवी संधी मिळाली आहे. या घटनेमुळे भारतीय राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहीला गेला आहे. संविधानाने प्रथमच आदिवासी महिलेला सर्वोच्च घटनात्मक पद देऊ केलं. आयुष्यात अनेक घाव झेलणार्या द्रौपदीजी सेवाभावी वृत्तीचा जणू वस्तुपाठच. त्यांची राष्ट्रपतीपदी झालेली निवड, महत्वपूर्ण सेवाकार्य आणि अलौकिकतेकडे केलेली वाटचाल यांचा खास वेध.
ताज्या निवडणुकीमध्ये त्यांना 63 टक्के मतं मिळाली. अतिशय शांत स्वभावाच्या मुर्मू लोकांना त्यांचे हक्क देण्यासाठीदेखील ओळखल्या जातात. आदिवासी समाजातून येऊन चिकाटीने कॉलेज गाठणार्या आपल्या प्रांतातल्या त्या पहिल्या युवती ठरल्या होत्या. त्यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातल्या आदिवासीबहुल मयूरभंज जिल्ह्यातल्या एका गावात झाला. या जिल्ह्यातल्या सात गावांमधून महाविद्यालयात पोहोचणार्या त्या पहिल्याच महिला. पुढचा अभ्यास आणि प्रगती याचा अंदाज घेता त्या काळात कॉलेजला जाणं मुलींसाठी स्वप्नासारखं होतं. बहुसंख्य आदिवासी असल्याने महाविद्यालयात जाणं अधिक आव्हानात्मक होतं. लहानपणी कॉलेजला जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी मुर्मू यांनी कठोर परिश्रम उपसले. त्यांनी मयूरभंज जिल्ह्यातल्या केबीएचएस उपरबेदा शाळेतून सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी भुवनेश्वर गाठलं. तिथून त्यांनी बॅचलरची (बीए) पदवी घेतली. त्यांची राजकीय कारकीर्द नगरसेवकापासून सुरू झाली. त्या मे 2015 ते जुलै 2021 पर्यंत झारखंडच्या राज्यपाल होत्या.
नोव्हेंबर 2016 चा काळ झारखंडच्या इतिहासात अशांततेनं भरलेला होता. रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दोन शतकं जुन्या असलेल्या जमीन कायद्यांमध्ये – छोटा नागपूर टेनन्सी (सीएनटी) आणि संथाल परगणा टेनन्सी (एसपीटी) कायद्यांमध्ये सुधारणा केल्या होत्या. या दुरुस्तीनुसार जमीन औद्योगिक वापरासाठी परवानगी देणं सोपं झालं असतं. या सुधारणेला राज्यभरातल्या आदिवासी समाजानं कडाडून विरोध करत निदर्शनं केली. या दुरुस्तीचा आदिवासींना कितपत फायदा होणार आहे, हे सरकारने स्पष्ट करावं, असं त्यांनी स्वतःच्याच सरकारला ठणकावून विचारण्यास मागेपुढे पाहिलं नाही. पुढील अडचणींचा विचार करून त्यांनी हे विधेयक सरकारला परत केलं. सरकारच्या निर्णयांवर त्यांनी कधीही डोळे झाकून शिक्का मारला नाही. आदिवासी भागातल्या असल्या तरी द्रौपदी यांना वडिल आणि आजोबांकडून नेतृत्वाचे धडे मिळाले. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही ग्रामपरिषदेचे प्रमुख राहिले आहेत. एक डिसेंबर 2018 रोजी रांची इथल्या ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडी अँड रिसर्च’ मध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारंभाला त्या कुलपती म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतल्या वकिलांच्या भूमिकेबद्दल बोलत असताना त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कौतुक केलं. संविधान निर्मितीतल्या या नेत्यांच्या योगदानाचं त्यांनी उघडपणे कौतुक केले. मुर्मू यांचा ठामपणा इतर काही प्रसंगांमध्येही दिसून आला आहे. त्यांनी प्रसंगी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका करायला मागेपुढे वलपाहिलेलं नाही.
देशाच्या राष्ट्रपतिपदापर्यंतचा मुर्मू यांचा प्रवास नक्कीच साधा, सोपा आणि सरळ नव्हता. मुर्मू यांनी 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी ओडिशा सरकारसाठी कारकून म्हणून काम केलं. पुढे पाटबंधारे आणि ऊर्जा खात्यात त्यांची कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. पुढे काही काळ त्यांनी ‘अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर’ या संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांनी 1997 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला एक वॉर्ड काऊन्सलर म्हणून सुरुवात केली. त्यानंतर रायरंगपूर नगर परिषदेत त्या नगरसेवक झाल्या, त्यांनी काही काळ नगरपालिकेचं उपाध्यक्षपदही भूषवलं. पुढे त्या भाजपच्या तिकीटावर रायरंगपूर विधानसभा मतदाससंघातून 2000 आणि 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या. आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात (2000 ते 2004) त्यांनी नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कामही सांभाळलं. 2009 मध्ये मुर्मू दुसर्यांदा आमदार झाल्या. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:ची गाडीही नव्हती. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती केवळ नऊ लाख रुपये होते. त्यांच्या पतीकडे एक बजाज चेतक स्कूटर आणि एक स्कॉर्पिओ गाडी होती. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी त्या चार वर्षं मंत्री राहिल्या होत्या. तसंच त्यांच्यावर चार लाखांचं कर्ज होतं. 2015 मध्ये मुर्मू भाजपच्या मयूरभंज जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. त्या वेळी त्यांना पहिल्यांदा राज्यपाल बनवण्यात आलं. 18 मे 2015 रोजी मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला तसंच पहिल्या आदिवासी राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला. जवळपास सहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या राज्यपाल पदावर होत्या. मुर्मू या झारखंडमधल्या लोकप्रिय राज्यपाल होत्या. म्हणूनच कदाचित त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही पदावरून हटवण्यात आलं नव्हतं. मुर्मू यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकेनं भरलेलं आहे. मुर्मू यांच्या पतीचं निधन झालं आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. सध्या त्यांच्या कुटुंबात एकुलती एक मुलगी आहे. मुर्मू यांच्यावर अनेकदा दु:खाचा डोंगर कोसळला. त्या पूर्णपणे तुटल्या होत्या. 2009 मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्या वेळी त्यांचा मुलगा फक्त 25 वर्षांचा होता. हा धक्का सहन करणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. यानंतर 2013 मध्ये त्यांच्या दुसर्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांच्या पतीचाही मृत्यू झाला. अशा स्थितीत मुर्मू यांना स्वत:ला सांभाळणं खूप कठीण होतं; मात्र प्रत्येक आव्हानाला सामोरं जात त्यांनी कठीण प्रसंगांवरही मात केली.
मुर्मू यांचं लग्न कसं झालं, भावी पती श्यामचरण त्यांना कसे भेटले हे सारं एखाद्या चित्रपटाच्या प्रेमकथेचा विषय ठरावा असं आहे. मुर्मू संथाल आदिवासी कुटुंबातून येतात. त्यांच्या वडिलांचं नाव बिरांची नारायण तुडू असं होतं. ते शेतकरी होते. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची भेट श्यामचरण यांच्याशी झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. श्यामचरण हेही त्या वेळी भुवनेश्वरमधल्या महाविद्यालयात शिकत होते. दोघांनाही पुढचं आयुष्य एकत्र जगायचं होतं. कुटुंबाच्या संमतीसाठी श्यामचरण लग्नाचा प्रस्ताव घेऊन द्रौपदीजींच्या घरी पोहोचले. त्यांच्या गावात श्यामचरण यांचे काही नातेवाईक रहात होते. अशा स्थितीत श्यामचरण आपला शब्द पाळण्यासाठी काका आणि नातेवाईकांसह द्रौपदीजींच्या घरी गेले. सर्व प्रयत्न करूनही द्रौपदीजींच्या वडीलांनी हे नातं नाकारलं. श्यामचरणही मागे हटणार नव्हते. त्यांनी ठरवलं होतं की लग्न करायचं तर ते द्रौपदीजींसोबतच. द्रौपदी यांनीही घरात स्पष्टपणे सांगितले होतं की, लग्न श्यामचरणशीच करेन! श्यामचरण यांनी द्रौपदीजींच्या गावात तीन दिवस तळ ठोकला. अनेक दिवस दोघेही आपल्या विचारांवर ठाम राहिल्यानंतर अखेर वडील आणि कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिला. यानंतर एक बैल, एक गाय आणि काही कपडे यासह दोघांचं लग्न ठरलं. असं म्हणतात की, द्रौपदी आणि श्याम यांच्या लग्नात लाल-पिवळ्या देशी कोंबडीची मेजवानी होती. यानंतर द्रौपदी पहारपूर गावच्या सून झाल्या. त्यांना चार मुलं झाली.
एक मुलगी, दोन तरुण मुलं आणि पतीच्या मृत्यूने कोलमडलेल्या द्रौपदी यांनी पहारपूरचं घर शाळेत बदललं. आता इथे अन्य मुलं शिकतात. पतीच्या पुण्यतिथीच्या एका कार्यक्रमात त्यांनी नेत्रदान करण्याची घोषणा केली आहे. मुर्मूजींच्या कुटुंबात आता त्यांची मुलगी इतिश्री आणि जावई गणेश हेमब्रम यांचा समावेश आहे. इतिश्री ही ओडिशातच एका बँकेत काम करते. अशा या सरळ साध्या, कुटुंबवत्सल आणि जगरहाटीला अत्यंत जवळून सामोर्या गेलेल्या एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपद मिळणं खरोखरच अद्भूत आहे.