दहा वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेवर हल्ला
नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप
। पाली । प्रतिनिधी ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पराकोटीला पोहोचला असून नागरिक आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसील कार्यालयासमोरील चौधरी यांच्या गोडाऊनजवळ मंगळवारी (दि.15) दहा वर्षांची चिमुरडी अक्षरा बळीराम कंक हिच्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिच्या पोटावर, मांडीवर आणि हातावर गंभीर चावा घेतला. सुदैवाने, जवळच काम करणाऱ्या एका महिला आणि तरुणाने तातडीने धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अक्षरावर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून तिला घरी सोडण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी ठाण्यावरून आलेल्या एका महिला भाविकाला पार्किंगच्या ठिकाणी कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. याशिवाय, हे भटके कुत्रे उभ्या असलेल्या अवजड वाहनांखाली आश्रय घेऊन गाड्यांच्या वायरी व तांत्रिक भाग तोडून नुकसान करत आहेत. यामुळे आतापर्यंत 25 ते 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिक विक्रांत चौधरी यांनी दिली.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाली नगरपंचायतीने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील ज्या भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक आहे. ठिकठिकाणी टोळक्याने राहणारे हे कुत्रे लहान मुले, नागरिक आणि दुचाकीस्वारांवर दबा धरून हल्ला करत असल्याने नगरपंचायतीने यांचा तातडीने कायमचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाली नगरपंचायतीने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील ज्या भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक आहे, त्या ठिकाणांची पाहणी करून संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पाली नगरपंचायतीने या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सुधागडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये रेबीजविरोधी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कुत्रा चावल्यास नागरिकांनी त्वरित उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हॅपी अम्ब्रेला संस्थेमार्फत यापूर्वी काही कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण झाले असून उर्वरित कुत्र्यांसाठी ही प्रक्रिया पुन्हा राबवली जाईल. तसेच शहरात कुत्र्यांसाठी ‘शेल्टर’ उभे करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
– पराग मेहता,
नगराध्यक्ष पाली नगरपंचायत






