| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, खेळण्यासाठी घराबाहेर पडणारी लहान मुले, महिला तसेच रात्री उशिरा घरी परतणारे नागरिक यांच्यामध्ये भटक्या श्वानांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते, उद्याने, सोसायट्यांचे परिसर आणि चौकांमध्ये श्वानांचे कळप फिरताना दिसत असून नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक लतीफ शेख यांनी भटक्या श्वानांचा गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित केला. भटक्या श्वानांची वाढती संख्या रोखण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या संस्थेकडून नेमके कोणते काम केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, काल-परवा कळंबोली परिसरात भटक्या श्वानांनी तब्बल अकरा जणांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भटक्या श्वानांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सध्या महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी केवळ एकच केंद्र असल्याने वाढत्या संख्येच्या तुलनेत ही व्यवस्था पुरेशी आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भटक्या श्वानांमुळे भीतीचे वातावरण
