ओमिक्रॉनला रोखण्यासाठी चिपी विमानतळावर कडक निर्बंध

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जागतिक महामारी असणार्‍या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटमुळे खळबळ माजली आहे. भारतात ओमिक्रॉन या कोरोना व्हेरीएंटचा प्रसार टाळण्यासाठी सर्वस्तरीय प्रशासन सज्ज झाले असून, याच पार्श्‍वभूमीवर चिपी विमानतळावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार असलेल्या देशांमधून मुंबई विमानतळावर उतरून चिपी विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांची माहिती आरोग्य विभागास कळवावी. अशा प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि त्या प्रवाशांची आरटीपीआर चाचणी दुसर्‍या, चौथ्या आणि सातव्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना आणखी सात दिवस गृहविलगीकरण करावे, असे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
याशिवाय, ओमिक्रॉनचा प्रसार झालेले देश वगळता इतर कोणत्याही देशामधून आलेल्या प्रवासी विमानतळावर आल्यास आरटीपीआर चाचणी अनिवार्य असणार आहे. जरी हा अहवाल निगेटिव्ह आला तरी अशा प्रवाशांना 14 दिवस गृहविलगीकरणात रहावे लागणार आहे.
तसेच, आरटीपीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, याबाबतची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकित्सक समन्वयाने करणार आहेत.

Exit mobile version