। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दिव्यांग कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यापासून गेली अनेक वर्ष शासनाच्या दुर्लक्षामुळे वंचित राहिले आहेत. वारंवार शासन, प्रशासन याच्याकडे निवेदन, पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटलेला नाही. अखेर दिव्यांग कर्मचाऱ्यांना उपोषण करण्याचे अस्त्र उगारावे लागले आहे. अलिबाग जिल्हा परिषद कार्यालयासमोर सोमवारी २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेमार्फत उपोषण करण्यात आले. मागण्याचा विचार केला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा पवित्रा कर्मचारी यांनी घेतला होता. अधिकारी वर्गाशी बोलणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
रायगड जिल्ह्यात साडे आठशे दिव्यांग कर्मचारी विविध विभागात शासकीय सेवेत आहेत. यापैकी अडीचशे कर्मचारी हे शिक्षण विभागात सेवा देत आहेत. दिव्यांग कर्मचारी याची पदोन्नतीची पदे आणि ७ फेब्रुवारी १९९६ पासुनच्या पदाची गणना करून दिव्यांग पदोन्नतीचा अनुशेष भरण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार जिल्हा परिषद कडे केला आहे. मात्र अद्यापही दिव्यांग कर्मचारी यांना आपल्या हक्काच्या पदोन्नती पासून वंचित ठेवले आहे. त्याचबरोबर वाहन भत्ता, स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी व उपकरण मिळण्याबाबत ही कारवाई प्रशासनामार्फत कारवाई केली जात नाही.
दिव्यांग कर्मचारी यांनी वारंवार प्रशासनाकडे आपले म्हणणे पाठवूनही काहीच कारवाई न झाल्याने अनेक कर्मचारी हे आपल्या हक्काच्या मागणीपासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाला जाग यावी यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असल्याचे सचिव संतोष माने यांनी म्हटले आहे.