सभागृहात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक
। मुंबई । वृत्तसंस्था ।
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या 80 बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील 29 बालकांना या रोगाची लागण झाली आहे.
यासंदर्भात प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप आणि अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधून अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
तसेच पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर आता सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे.