प्रचारासाठी जोरदार मोर्चेबांधणी

सरपंचासाठी 29, तर सदस्यासाठी 174 उमेदवार रिंगणात

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागाड तालुक्यात 14 ग्रामपंचायतींची निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, सरपंचपदासाठी 29 आणि सदस्यपदासाठी 174 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यातील हातोंड, अडुळसे, खवली, घोटावडे, तिवरे, आपटवणे, शिळोशी, सिद्धेश्‍वर बु., चिवे, ताडगाव, खांडपोली, आतोणे, चंदरगाव व माणगाव बु. ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

आता ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असल्याने उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. शक्तीप्रदर्शनासदेखील सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रक्ताचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उभे आहेत. यामुळे नक्की कोणाला मतदान करायचे या संभ्रमात मतदारराजा पडला आहे.

गावागावांत निवडणुकीच्या चर्चा
सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. गावागावात, पारावर, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी आहे. कोण किती मते घेणार, कोणी किती विकासाची कामे केली याचे विश्‍लेषण सुरू आहे. शिवाय जेवणावळी, ओल्या-सुक्या पार्ट्या आणि रोजची खर्चीसुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांसाठी निवडणूक म्हणजे जणू काही दिवाळीच वाटू लागली आहे.

शहरातील मतदारांवर लक्ष
बहुसंख्य मतदार हे सहकुटूंब कामानिमित्त मुंबई, ठाणे व पुणे आदी शहरांत गेले आहेत. तर अनेक आदिवासी कुटुंबे कामानिमित्त तात्पुरती स्थलांतरित झाली आहेत. हे मतदार एकगठ्ठा मतदान करतात. शिवाय त्यांची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते या हक्काच्या मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यांची विशेष मर्जी सुद्धा राखली जात आहे. शिवाय, मतदानाच्या आदल्या दिवशी खासगी गाड्यांनी त्यांना आणण्याची व खाण्यापाण्याची बडदास्तदेखील राखली जाते.

Exit mobile version