| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मानिवली गावातील रोहित भगवान गवळी या विद्यार्थ्याचा रायगड हॉस्पिटलमध्ये आंत्रपुच्छ (अपेंडिक्स ) आजारावरील शस्त्रक्रिया केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच माणीवली आणि बेकरे गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या तरूणाच्या मृत्यूची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबई येथील जे-जे रुग्णालयात करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने मृत तरुणाच्या नातेवाईकांना दिले आहे.
मानिवली येथे राहणारा रोहित भगवान गवळी हा विद्यार्थी या वर्षी दहावीला होता. पोशीर येथील श्रमजीवी विद्यालयात शिकत होता. रोहित भगवान गवळी हा पोटात दुखत असल्याने दि. 20 फेब्रुवारी रोजी कर्जत येथे सोनोग्राफी करण्यासाठी गेला होता. सोनोग्राफी अहवालावरून त्या तरुणास रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले. दहावीच्या परीक्षेपूर्वी पोट दुखी संपवून टाकावी यासाठी गवळी कुटुंबाने आंत्रपुच्छ आजारावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रायगड हॉस्पिटल येथे तपासणी केल्यानंतर त्या तरुणांची प्रकृती खालावली असल्याने सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. काही संतप्त जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली असून त्याबाबत रायगड हॉस्पिटल प्रशासनाने कोणतीही तक्रार केली नाही.
नेरळ पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी परिस्थिती हाताळून जमावास शांत राहण्याचे आवाहन केले. नातेवाईकांच्या मागणीनुसार कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे शव विच्छेदन न करता मुंबई येथे मृतदेह पाठविण्यात आला. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता रोहित गवळी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ईन कॅमेरा करण्यात आले. त्या अहवालावर पुढील कारवाई नेरळ पोलीस करणार आहेत.







