ई-रिक्षातून पडून विद्यार्थी जखमी

पोलीस ठाण्यात वाद मिटला

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमधील विद्यार्थ्यांच्या सोयीची ठरत असलेली ई-रिक्षा विद्यार्थ्यांसाठी अपघातास कारणीभूतदेखील ठरू शकते. बुधवारी सकाळी रिक्षामधून प्रवास करीत असताना गुलिस्तान बंगला परिसरातील रस्त्यावर ई-रिक्षामधून एक विद्यार्थी खाली पडला. मात्र त्या विद्यार्थ्याला किरकोळ जखम झाल्याने पोलिसात तक्रार दाखल न करता प्रकरण मिटविण्यात आले.

ई-रिक्षामधून प्रवास करीत असताना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणार्‍या चालकाने गाडीचे ब्रेक दाबले आणि त्यावेळी तो विद्यार्थी झाली कोसळला. शेवटी त्याच रिक्षामधून विद्यार्थ्याला माथेरान पालिकेच्या बी.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ खरचटलेले असून, मलमपट्टी करून विद्यार्थ्याला सोडण्यात आले. मात्र नंतर हा वाद प्रथम ई-रिक्षेच्या हुतात्मा स्मारक येथील स्टँडवर पालकांनी गोंधळ घालून आणि नंतर माथेरान पोलीस ठाणे गाठून उकरला. शेवटी माथेरान पोलीस ठाण्यात ई रिक्षा चालक आणि त्या विद्यार्थ्याचे पालक यांच्यात समेट झाली आणि कोणत्याही तक्रारी विना हा वाद मिटला आहे.

मात्र या प्रकाराने माथेरानमधील ई-रिक्षासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुलिस्तान बंगला असा रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित करणे तसेच ई-रिक्षामधून अतिरिक्त प्रवासी यांना प्रवास करू न देणे हे विषय त्यानिमित्ताने पुढे आले आहेत.

Exit mobile version