watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

अलिबाग -रोहा मार्गावर वाहतूक कोंडी; रस्त्याच्या नूतनीकरणाचा बसतोय फटका

| रायगड । प्रतिनिधी ।

अलिबाग-रोहा रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या कामामुळे नागरिकांचे हाल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा संताप व्यक्त होत आहे. विशेषतः बारावीच्या परीक्षेच्या काळात वाहतूक नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अक्षरशः झुंज द्यावी लागली.


सहाणगोठी ते सहाण बायपास आणि आरसीएफ कॉलनी कुरुळ गेट ते कुरुळ वळण दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे सकाळपासूनच वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सकाळी अकरा वाजता पेपर असताना अनेक विद्यार्थ्यांना रस्त्यात अडकून बसावे लागले. काही विद्यार्थ्यांना पायपीट करत परीक्षा केंद्र गाठावे लागले, तर काहींना उशिराने पोहोचावे लागले हा प्रकार प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या समन्वयाच्या पूर्ण अपयशाकडे बोट दाखवणारा असल्याचे नागरिकांचे मत आहे.
रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधणे ही कंत्राटदाराची मूलभूत जबाबदारी मानली जाते. मात्र या प्रकरणात वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलेले दिसले. त्यामुळे कामाची गुणवत्ता सांगणाऱ्यांनी आधी नियोजनाची गुणवत्ता दाखवावी, असा सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना तरी वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी आणि रस्ते कामाचे वेळापत्रक तात्पुरते बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असताना नियोजनशून्य कामे करून प्रशासन आणि कंत्राटदार नेमका कोणाचा विकास करत आहेत, असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.

Exit mobile version