शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री

| पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.1) शनिवार रोजी ऑनलाईन जिओच्या 5G सेवेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पनवेल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत उपस्थित राहून या सेवेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. या सेवेचा फायदा आपल्या सुरक्षिततेसाठी, चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी करा. त्यामध्ये मनोरंज, सिनेमा व गेम आहेतच, पण त्यातील चांगल्या बाबी घ्या, बाकी वगळा, विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या सेवेतील शिक्षणाशी निगडीत असा प्रयोग महापालिकेच्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले शाळेची निवड केल्याबद्दल प्रतंपधान मोदी, अश्‍विनी वैष्णव आणि त्यांच्या टीमला यावेळी धन्यवाद दिले. यावेळी प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.

5G च्या माध्यमातून सगळ्या शाळा एकमेकांशी जोडल्या जातील, त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावला जाऊ शकतो. शिक्षकांसाठीही उपयुक्त माध्यम आहे. त्यांचे ही प्रशिक्षण या माध्यमातून करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रातदेखील यामुळे क्रांती घडेल. दृश्य माध्यमामुळे मुलांना त्याचे लवकर आकलन होऊन त्यांच्या आकलन शक्तीमध्ये प्रभावी परिवर्तन होईल. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयातदेखील याचा उत्तम वापर होऊ शकतो. यामुळे नॉर्मल क्लासेस स्मार्ट क्लासेसमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. त्यामुळे उत्तम दर्जाचे शिक्षण मिळू शकेल. ई-लर्निंग, डिजिटल क्लास रूम, शिक्षक प्रशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण कोणताही अडथळा न येता जलदगतीने मिळू शकते. शिक्षकांना ही त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर शेतीमध्ये ही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बँकिंग, वैद्यकीय सेवेत ही त्याचा आपण जसा वापर करत जाऊ तसा फायदा होणार आहे. त्यामुळेच 5G मुळे देशात डिजिटल क्रांती होणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Exit mobile version