स्वागतासाठी शाळाचे जय्यत तयारी; लेझीम पथकासह विद्यार्थ्यांचा हिरमोड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शिक्षणमंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली, लेझीम पथकाने सराव केला, शाळांचे प्रवेशद्वार फुलांनी सजवले, रांगोळ्या काढल्या आणि शिक्षकांनीही जय्यत तयारी केली. मात्र, ज्या शिक्षणमंत्र्यांच्या स्वागतासाठी हा सारा खटाटोप सुरू होता, तेच शाळेत आले नाहीत. त्यामुळे तासन्तास त्यांच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला, तर शाळा प्रशासनाची मेहनतही वाया गेली. राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या शुक्रवारच्या (दि.9) रायगड दौऱ्यातील या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावर आणि मंत्र्यांच्या दौऱ्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण विभागाकडून तयारी सुरू होती. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना योग्य तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील अनेक शाळांनीही मंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेष मेहनत घेतली. शुक्रवारी सकाळी विद्यार्थी पारंपरिक पेहरावात सज्ज झाले. लेझीम पथकाने स्वागतासाठी तयारी केली, तर शाळांचे परिसर फुले, आकर्षक वस्तू आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आले. शिक्षणमंत्री शाळेत येतील, विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह शिक्षकांना होती.
अलिबाग तालुक्यातील सुमारे दहा शाळांना भेटी देण्याचे नियोजन असल्याची माहिती होती. मात्र, त्यापैकी केवळ चार शाळांनाच भेटी देण्यात आल्याचे समोर आले आहे. उर्वरित शाळांमध्ये स्वागताची तयारी करून विद्यार्थी आणि शिक्षक मंत्र्यांच्या आगमनाची वाट पाहत राहिले. प्रत्यक्ष भेट न झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह मावळला, तर शिक्षक आणि शाळा प्रशासनाचीही निराशा झाली. दौऱ्याच्या नियोजनात कोणत्या शाळांना भेटी द्यायच्या, याबाबत स्पष्टता होती का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अलिबागमधील सेंट मेरी स्कूलमध्येही शिक्षणमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून लेझीमचा सराव सुरू होता. शाळेचा परिसर फुले आणि विविध आकर्षक वस्तूंनी सजवण्यात आला होता. स्वागतासाठी सभामंडपही उभारण्यात आला होता. मात्र, शिक्षणमंत्री भुसे यांनी या शाळेला भेटच दिली नसल्याची चर्चा आहे. स्वागतासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना मंत्र्यांची भेट न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणि शाळेने घेतलेल्या मेहनतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
शिक्षणमंत्र्यांचा दौरा म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी असते. अशा भेटीतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळू शकते; मात्र नियोजित भेटी झाल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरते. स्वागतासाठी शाळांनी केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट पाहता, या दौऱ्याच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिक्षण विभागाचे वाभाडे
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षण विभागाकडून स्वागतासाठी सुरू असलेली घाई पाहून मंत्रीही संतापल्याचे सांगितले जाते. भाषणातून शिक्षण विभागाच्या कामाचे कौतुक करतानाच त्यांनी विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे एका बाजूला शाळांमध्ये स्वागताची तयारी करूनही विद्यार्थ्यांना मंत्र्यांची भेट मिळाली नाही, तर दुसरीकडे बैठकीत शिक्षण विभागाच्या कारभारावरच नाराजी व्यक्त झाल्याची चर्चा रंगली.
