पोलिसांनी वाचवले चालकाचे प्राण

अचानक आला हृदयविकाराचा झटका
। पनवेल । वार्ताहर ।
द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणार्‍या एका वाहनचालकासाठी वाहतूक पोलीस देवदूत ठरले आहेत. वाहन चालवताना अचानक हृदयविकाराचा सौम्य झटका आलेल्या या चालकावर वाहतूक पोलिसांनी वेळीच प्राथमिक उपचार केले. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्या वाहनचालकाचे प्राण वाचल्याने वाहतूक कर्मचार्‍यांचे सर्व स्तरांवरून कौतुक केले जात आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून एक वाहनचालक मुंबईच्या दिशेने येत असताना त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. यावेळी द्रुतगती महामार्गावरील शेडुंग फाटा किलोमीटर 9 वर तैनात असलेले वाहतूक विभागाचे कर्मचारी धनाजी शिंदे, रघुनाथ ढगे आणि नितीन कारखिले यांच्या लक्षात आले. त्यांनी वैद्यकीय प्रशिक्षणाचा उपयोग करून चालकावर आपत्कालीन उपचार केले. त्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात तत्काळ दाखल केले.

Exit mobile version