। अलिबाग । भारत रांजणकर ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या कन्या आणि सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गीता पालरेचा यांनी यापूर्वी सुधागड-पाली पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्षा म्हणून देखील काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओसवाल कुटुंबिय ओळखले जातात. त्यामुळे गीता पालरेचा भाजपात जाणार असल्याचा मोठा धक्का राष्ट्रवादी काँगे्रेसला सहन करावा लागणार असल्याने जिह्यातील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गीता पालरेचा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या की, आपण भाजपात जाण्याचा विचार करत आहोत. मात्र, राष्ट्रवादीबाबत कोणावरही कसलाही आरोप आपण करणार नसून, फक्त आणि फक्त सुधागड तालुका आणि नगरपंचायत यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून या निर्णयाप्रती आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनील तटकरे यांचे पुतणे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. सुधागड पालीमधील प्रतिष्ठित असलेले ओसवाल कुटुंबिय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत समजले जातात. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल हे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे यांचे विश्वासू म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ओसवाल यांनी अनेक वर्षे सांभाळली. अनेकवेळा आमदारकीने हुलकावणी देऊनदेखील वसंत ओसवाल यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. त्याच वसंत ओसवाल यांच्या राजकीय वारसदार म्हणून मानल्या जाणार्या त्यांच्या कन्या गीता ओसवाल यांनी मात्र सुधागड पाली तालुक्याच्या तसेच नगरपंचायतीच्या विकासाचा मुद्दा पुढे करीत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रायगडच्या राजकारणात भूकंप झाला आहे.
गीता पालरेचा या नव्यानेच अस्तिवात आलेल्या सुधागड-पाली नगरपंचायतीच्या विद्यमान पहिल्या नगराध्यक्षा आहेत. त्यांनी यापूर्वी सुधागड पंचायत समितीच्या सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणूनदेखील काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षपदाची धुरादेखील काही काळ त्यांनी सांभाळली आहे. ‘कृषीवल’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजारो देतानाच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा आपण ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र, भाजपात प्रवेश करण्याचा विचार नक्कीच करीत असल्याचे स्पष्ट केले.
ओसवाल साहेबांपासून आमच्यासोबत असणार्या सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी सोडताना कोणाबाबतही आपला आक्षेप नाही. पण, माझ्यासोबत असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, काही कामे असतील, तालुका असेल, नगरपंचायत असेल, या सर्व गोष्टींचा जो व्हायला पाहिजे, तसा विकास सध्याच्या पक्षाकडून झाला नाही. म्हणून मला असा निर्णय घ्यावासा वाटतो आहे. तटकरे साहेबांसोबत आपले कसलेही विशेष मतभेत असे काही झालेले नाहीत. त्यांच्याशी आमचे असलेले जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध कायम तसेच राहतील, असेही त्या म्हणाल्या. सुधागड तालुका आदिवासी विभाग आहे. औद्योगिक विकासदेखील होऊ शकलेला नाही. दुर्गम भाग म्हणून नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. बेरोजगारीचे प्रश्न सुटलेले नाहीत. वारंवार विकासकामांकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे माझा निर्णय ठरलेला नसला तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपण विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा आपण ठाम निर्णय घेतलेला नसला तरी सुधागड तालुक्याचा सर्वांगिण विकास डोळ्यासमोर ठेवून भाजपात प्रवेश करण्याचा विचार करीत आहे. मात्र, सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विचार घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाही.
गीता पालरेचा
नगराध्यक्ष, सुधागड पाली