पाण्यावर शेवाळ अन् केमिकलचा तवंग; नागरिकांसह प्राण्यांचे आरोग्य धोक्यात
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यासह खालापूर, रोहा व पेण इत्यादी तालुक्यातून वाहणारी व अनेकांची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीतून पाली शहराला पाणी पुरवठा होतो. तसेच, सुधागड तालुक्यातील अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणी देखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात. मात्र, सध्या अंबा नदीचे पाणी शेवाळ व केमिकलच्या तवंगामुळे प्रदूषित झाले आहे. पाण्यावर शेवाळ व रसायनामुळे हिरवट, पिवळा व लालसर तवंग आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, भाविक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे कार्यान्वीत करुन अंबा नदीचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच, नदीतून वाहून आलेले प्रदूषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. रासायनिक कपंनीमधुन टाकऊ रसायन हे थेट आंबा नदीत सोडले जाते. तसेच, रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच, नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखिल पाणी खराब होते. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंधी येते, चवही खराब लागते. पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी बहुसंख्य नागरिक अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेतात.
पालीकरांनाप दूषित पाणी पुरवठा
अंबा नदीच्या पाण्यावर कोणतीही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. शिवाय पाणीपुरवठा देखील अनियमित होतो.
शुद्ध पाणी योजनेचा विसर
पाली शुद्ध पाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. सध्यास्थितीत तिचा एकूण खर्च आता 25 कोटींवर गेला आहे. मात्र, ही 25 कोटिंची शुद्ध पाणी पुरवठा योजना लालफितीत अडकली आहे. राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय बाबी यामध्ये ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजुनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सर्व निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्ध पाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन देतात. मात्र अजून काहीच झालेले नाही. प्रशासन व राजकारण्यांना पालीकरांचे हाल दिसत नाहीत. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
अंबा नदीचे पाणी लॅबला परीक्षणासाठी पाठवले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची त्वरित सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. सोमवारी (दि.8) प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंबधीचे पत्र दिले जाईल. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, पाली
