प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

। अलिबाग । प्रतिनिधी ।

खालापूर येथील एका महिलेने प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्या प्रियकराने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप महिलेच्या भावाने केला असून याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार कृतिका असे मयत महिलेचे नाव आहे. ती फिर्यादीची बहिण होती. तिच्यासोबत घटस्फोट झाला होता. चार वर्षापूर्वी कर्जतमधील स्वास्ति फायनान्सकडून तिने कर्ज घेतले होते. त्या ठिकाणी काम करणार्‍या सुशील जाधव यांच्याशी तिची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत, त्यानंतर प्रेमात झाले. गेल्या दोन वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. सुशील याने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीकता साधली होती. परंतु मागील महिन्यात त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे कृतिकाने त्याच्याशी बोलणे बंद केले. परंतु तो तिला सतत फोन करून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. अन्यथा फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी वारंवार देत होता. त्याने तिला मारहाणदेखील केली होती. सतत मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून कृतिकाने 21 ऑक्टोबर रोजी अखेर या जाचाला कंटाळून खोपोली येथील राहत्या घरी सायंकाळी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Exit mobile version