| धुळे | वृत्तसंस्था |
एकाच घरातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यामध्ये घडली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश असून धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. एकाच घरातील चौघांची आत्महत्याप्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे व मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असे आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. यापैकी प्रविण गिरासे यांनी गळफास घेऊन तर कुटुंबातील इतर तिघे जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या सामुहिक आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून संपूर्ण कुटुंबाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.