सुखदेवे साहेब, अजून किती अपघात हवेत

आतातरी अलिबाग-बेलकडे रस्त्याची दुरुस्ती करा!; मोऱ्यांचे कठडे जमीनदोस्त, साईडपट्टी खचली

| चौल | राकेश लोहार |

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रविवारी 27 ऑगस्ट रोजी अलिबाग-बेलकडे रस्त्यावर अपघात झाला आहे. दरम्यान, या रस्त्यावरील असणाऱ्या मोऱ्यांवरील संरक्षक कठडे जमीनदोस्त झाले आहेत, येथील रस्त्याची साईडपट्टी खचली आहे, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनसुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही. या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात असून, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का, असे म्हणायची वेळ आली आहे.

अलिबाग-बेलकडे रस्त्यावर रविवारी ( 27 ऑगस्ट) दुपारी 12 वाजताच्या सुमारास डम्परने हुलकावणी दिल्याने (एमएच 46 बीके 8735) ही कार मोरी रस्त्याच्या बाजूला जाऊन खाडीत कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकासह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड हे दोन्ही मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरम्यान, या मार्गावरील कुरुळ गावाच्या पुढील गिरोबा मंदिराच्या परिसरातील रस्त्याची साईडपट्टी खचली असून, याठिकाणच्या दोन्ही मोऱ्यांचे संरक्षक कठडे जमीनदोस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.ई. सुखदेवे यांना या रस्त्याच्या स्थितीबाबत पूर्णपणे कल्पना याआधीही देण्यात आली आहे. दि. 25 मार्च 2023 रोजी याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून मोरीवरील संरक्षक कठडे गायब झाले असून, रस्त्याची साईडपट्टीदेखील मोठ्या प्रमाणात खचली आहे, त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अलिबाग-रोहा रस्त्याचे काम सुरू असून, त्या कामाबरोबरच येथील मोऱ्यांचे संरक्षक कठडे नव्याने बांधण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु, आपण दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडलेला असून, रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्यानेच आज भीषण अपघात झाला आहे. याबाबत स्थानिकांसह वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आश्वासनाचा विसर
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कृषीवलने 26 मार्च 2023 रोजी वृत्त प्रकाशित करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.ई. सुखदेवे यांना कल्पना दिली होती. त्यावेळी त्यांनी अलिबाग-रोहा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून, या कामासोबतच मोरीचे कठडे आणि रस्त्याची साईडपट्टी भरण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते हवेतच विरले असून, संबंधित कामाबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. दरम्यान, याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

…तर बांधकाम विभाग जबाबदार
याठिकाणी कोणताही अपघात झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभागा जबाबदार राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. जाणूनबुजून या कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आनंदावर विरजण् नको
आगामी सण-उत्सवाच्या काळात या मार्गावरुन मोठ्या संख्येने चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ वाढणार आहे. याठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. अशा वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी, संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करावी.

Exit mobile version